Subscribe:

Ads 468x60px

23 January 2012

नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म :- २३ जानेवारी १८९७, कटक
अदृष्य :- १८ ऑगस्ट १९४५, फोर्मोसा

२३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे सुभाषचंद्र बोस या महान क्रांतोसूर्याचा उदय झाला. जानकीनाथ व प्रभादेवी यांचे सुभाषचंद्र हे दैदिप्यमान अपत्य. लहानपणापासूनच प्रगल्भ असलेले सुभाषबाबू उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तेथे आय. सी. एस. ची परीक्षा उच्चश्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना नोकरी मिळाली. पण त्या नोकरीमुळे त्यांना अस्वस्थता भासू लागली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. स्वातंत्र्याची तळमळ त्यांना लागलेली, त्यांनी गांधींची भेट घेतली. परंतू त्यांच्या धोरणामूळे सुभाषबाबूंचे समाधान झाले नाही. मग ते देशबंधु चित्तरंजन दास यांचे शिष्य झाले.


१९२८ साली बंगालमध्ये झालेल्या क्रांतिकारकांच्या कटाचे ते खरे सूत्रधार होते. सरकारने त्यांना अटक करून मंडाले येथे तुरूंगात पाठवले. तेव्हा जनतेने केलेल्या विराट आंदोलनामुळे बाबूंना सरकारने मुक्त केले. प्रांतिक परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून त्यांनी स्वातंत्र्याच्या ध्येयाची घोषणा केली. अनेक कारणांनी त्यांचे गांधींशी पटले नाही. १९३१ - सविनय कायदेभंगांची चळवळ मागे घेण्यावरून गांधींवर कडक टिका केली. १९३२ मध्ये लगेच त्यांना पकडून कैदेत ठेवण्यात आले. या अटकेमुळे ते कॉन्ग्रेस व देशभरातही फार लोकप्रिय झाले. गांधींच्या विरोधास न जुमानता त्यांना त्रिपुरा कॉन्ग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्यात आले. तेथे ते आजारी असतानाही गांधी पक्षाकडून त्यांना अतिशय त्रासदायक वागणूक देण्यात आली. या पक्षीय राजकारणाचा उबग आल्याने काही दिवसांनी त्यांनी अध्यक्षपदाचा राजिनामा दिला. त्यांना त्यांच्या जहाल धोरणामुळे कॉन्ग्रेसमधून ३ वर्षे काढून टाकण्यात आले. यामागे सुभाषबाबुंची गांधींपेक्षा जास्त होत असलेली लोकप्रियता कारणीभूत होती.

दुसरे महायुद्ध सुरू होताच या संधींचा फायदा घ्यावा, हा विचार गांधीवादी पुढार्‍यांना पटला नाही. म्हणून सुभाषबाबू १९४० साली मुंबई येथे सावरकरांना भेटले.

सावरकरांनी त्यांना सैन्य हे महत्वाचे सामर्थ्यकेंद्र कसे हे पटवून दिले. त्यांना सावरकरांनी ३ पर्याय सांगितले.

१) आपल्या देशातच इंग्रजांची आडवणूक करणे

२) संधी साधून सैन्यात उठाव करणे

३) बाहेरून मिळणार्‍या सशस्त्र साहाय्याचे नेतृत्व करणे.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी हिंदी क्रांतिकारकांनी केलेल्या अशाच प्रयत्नांचा इतिहास सावरकरांनी त्यांना सांगितल्यामुळे सुभाषबाबूंच्या विचारास नवीन दिशा लागली. हॉलवेलचा पूतळा उखडून टाकण्याच्या चळवळीत त्यांना अटक करून पूढे त्यांच्याच घरात त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. तेव्हा सावरकरांनी सांगितलेल्या तिसर्‍या मार्गाचा ते विचार करू लागले. बाहेरून ब्रिटिश सैन्याविरूद्ध हल्ला चढविण्याइतकी सामर्थ्यशाली लढाऊ सेना संघटित करण्याचा विचार त्यांच्या मनात नक्की झाला. शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले.

इंग्रजांच्या नजरकैदेतून ते अत्यंत रोमहर्षकपणे गुप्त होऊन भुमीगत झाले. अफगणिस्तान - रशियामार्गे ते जर्मनीत दाखल झाले. हिटलर, मुसोलिनी, डी. व्हिलेरा इत्यादी मोठ्या नेत्यांशी त्यांनी संपर्क प्रस्थापित केले. नेताजी पाणबुडीने जपानला पोचले. तेथे थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच्याशी त्यांचा संपर्क आला. 'आझाद हिंद फौजे'ची धुरा नेताजींनी स्विकारली. सरसेनापती झाल्यावर हंगामी सरकार स्थापन करून इंग्रज सरकारला हादरा दिला. जपानने सिंगापूर जिंकले तेव्हा ७०,००० हिंदी सैनिक युद्धबंदी म्हणून पकडले होते. रासबिहारी बोस व नेताजींनी या ७०,००० हिंदी सैनिक बंद्यांची आझाद हिंद सेना बलिष्ठ केली. लवकरच नेताजींच्या फौजेने अंदमान - निकोबार बेटे ताब्यात घेऊन त्यांना 'शहीद' व 'स्वराज्य' ही नावे दिली.

२६ जानेवारी १९४४ ला सुभाषबाबूंनी रंगून येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. नेताजींची अमरवाणी , "तूम मुझे खून दो - मै तुम्हे आजादी दुंगा !" ही इथूनच प्रगट झाली. १८ मार्च १९४४ या दिवशी १०,००० सैन्यानिशी नेताजींनी मातृभूमीत प्रवेश करून इंफाल, मोरा, कोहिमा या ठिकाणी प्रतिपक्षावर विजय मिळवले.

हिंदुस्थानच्या दिशेने आजाद हिंद सेनेची आघाडी बघून गांधी - नेहरू मंडळींनी ब्रिटीशांना पाठिंबा दर्शविला. नेहरूंनी तर चक्क आजाद हिंद फौजेविरूद्ध लढा देण्याचे आवाहन देशाला केले. कारण त्यांना हिंसेने मिळणारे स्वातंत्र्य नको होते. फक्त अहिंसेने मिळणार्‍या स्वातंत्र्याचेच ते पूजारी होते. नेताजी जर यशस्वी ठरले असते तर भारतीयांनी अखंड हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून नेताजींचाच गौरव करून, शिरपेच चढवला असता. कारण इतकी लोकप्रियता नेताजींना लाभलेली होती. याच ठिकाणी नेहरूंच्या नेताजी विरोधाची पाळे-मूळे आहेत.

No comments:

Post a Comment